जन्म – चैत्र शु. ९ ( रामनवमी ) शके १५३० : सन १६०८ दुपारी बारा वाजता. जिल्हा – औरंगाबाद, तालुका – अंबड, गाव – जांब. गोदावरी नदीकाठी, नाव – नारायण. मोठा भाऊ – गंगाधर, पिता – सूर्याजीपंत, माता – राणूबाई, आडनाव – ठोसर. घराण्यात सूर्य आणि श्रीराम यांच्या उपासनेची दीर्घ परंपरा.

बालपण – मर्दानी खेळ, व्यायाम यांची आवड, शरीर कमावलेले, बुध्दी तीव्र, मनोनिग्रह दृढ. वृत्ती हनुमंत आणि श्रीराम यांच्या भक्तीकडे. भक्ती, शुध्द चारित्र्य यांच्या अभावी लोक जन्ममृत्युच्या फेर्‍यात अडकतात याचे दु:ख वाटे. यातून लोकांची सुटका कशी करता येईल याची बालपणापासून चिंता. स्वत:चा विवाह, गृहस्थाश्रम यांची नावड. जन्मजात विरागी. वयाच्या अकराव्या वर्षी श्रीरामाचा साक्षात्कार. श्रीरामाचा आदेश – कृष्णातीरी जाऊन धर्मस्थापना करणे. शिसोदिया वंशी शिवनामा अवतार घेणार आहे. त्यास उपासना देऊन साह्य करणे

आईच्या आग्रहाखातर नारायण लग्नाच्या बोहल्यावर उभा राहिला. त्यावेळी वय बारा वर्षांचे. पण विवाहमंत्रातील ‘सावधान’ शब्द ऎकताच खरोखरीच सावध होऊन पलायन. थेट नाशिक – पंचवटी गाठली. श्रीरामाचे दर्शन घेऊन साधनेसाठी निवांत स्थळ म्हणून नाशिकजवळील टाकळी येथे राहणे. तेथे गोदावरी – नंदिनी नद्यांचा संगम.

साधना – भल्या पहाटे उठणे. प्रातर्विधी, स्नान, सूर्यनमस्कार. मग नदीच्या पात्रात कमरेइतक्या पाण्यात उभे राहून सूर्य माथ्यावर येईपर्यंत ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या तेरा अक्षरी मंत्राचा जप. त्यानंतर फक्त पाच घरी माधुकरी मागणे. श्रीरामाला नैवेद्य दाखवून मग स्वत: जेवणे. दुपारी पंचवटीतील श्रीराममंदिरात जाऊन अध्यात्मग्रंथांचे वाचन – श्रवण. वाल्मिकी रामायणाचा अभ्यास व लेखन. सायंकाळी प्रवचन कीर्तन, रात्री भजन ऎकणे. आरती झाल्यावर निद्रा.

असा क्रम अखंड बारा वर्षे. तेरा कोटी श्रीरामनामाचा जप. परिणामी अष्टसिध्दींची प्राप्ती व श्रीरामाचा साक्षात्कार. धर्मस्थापना करावी, असा रामाचा आदेश. रामानेच ‘समर्थ’ अशी पदवी देणे. पूर्वीचे नारायण हे नाव लुप्त. मात्र स्वत:ला नेहमी ‘रामदास’ म्हणवून घेणे.

तीर्थयात्रा व लोकस्थितीचे अवलोकन – शके १५५४ म्हणजेच सन १६३२ मध्ये तीर्थयात्रा व धर्मस्थापना यासाठी टाकळीतून बाहेर पडणे. पुढील बारा वर्षात आसेतुहिमाचल भारतभ्रमण. लोकस्थितीचे सूक्ष्म अवलोकन. ध्यानात आले की, वारंवार पडणारे ओले – कोरडे दुष्काळ आणि मुसलमान सुलतानांची पाशवी आक्रमणे – त्यांचे मदतनीस आपलेच लोक – यांनी सगळे समाजजीवन उध्वस्त झालेले. लोक भीतिग्रस्त आणि निराश. त्यातून सर्वत्र अधर्म माजलेला. ही देश – लोकस्थिती वर्णन करणारी रामदासांची ‘अस्मानी सुलतानी’ आणि ‘परचक्रनिरुपण’ ही दोन स्फुट काव्ये. भारताच्या संपूर्ण संतवाङ्‍मयात अशी स्वकाळाची वर्णने करणारी काव्ये नाहीत.

उध्वस्त समाज, निराशेने दैववादी झालेले लोक पाहून रामदासस्वामीही हळहळले. पण नुसते हळहळत बसणे हा विश्वकल्याणाची चिंता लागलेल्या रामदासांचा स्वभावच नव्हता. ह्या दु:स्थितीतून समाजाला बाहेर काढून त्याच्या हातून शुध्द धर्माचे रक्षण, आचरण व्हावे आणि यासाठी स्वत:च्या हाती राज्यसत्ता असायला हवी या विचारांचा त्यांनी प्रसार – प्रचार करायला सुरुवात केली.

कार्यारंभ व विस्तार – आपल्या या समाज जागृतीच्या कार्याला चाफळ हे ठिकाण उत्तम आहे असे समजून स्वामी शके १५६६ – सन १६४४ मध्ये तेथे आले. तेथे श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करुन धडाक्याने रामजन्मोत्सव सुरु केला.

संकटांविरुध्द झगडण्यासाठी आधी लोकांना धीर द्यायला पाहिजे. म्हणून रामदासस्वामी म्हणाले, ” धीर धरा धीर धरा तकवा । हडबडू गडबडू नका । काळ देखोनि वर्तावे । सांडावे भय पोटीचे ॥”

अन्यायाविरुध्द लढण्यासाठी समाज उभा करायचा असेल तर त्याचे ध्येय, त्याची आदर्शभूत दैवतेच बदलायला पाहिजेत असे म्हणून शत्रूवरील क्रोधाने ज्याच्या नेत्रातून आग्निज्वाळाच बाहेर पडत आहेत असा सामर्थ्यसंपन्न हनुमंत आणि रावणाचा वध करुन त्याच्या बंदीखान्यात पडलेल्या देवांना सोडविणारा धनुर्धारी राम रामदासांनी समाजापुढे उभा केला.

रामदासांनी गावोगावी मारुतीची देवळे स्थापन करुन तरुणांना शक्ती कमविण्याचा संदेश दिला. पण नुसत्या शक्तीने काय होणार? म्हणून अशा सशक्त तरुणांची संघटना करुन शत्रूवर तुटून पडा असे रामदासांनी सांगितले. ते म्हणत, जगात ” कोण पुसे अशक्ताला । रोगीसे बराडी दिसे ॥ शक्तीने मिळती राज्ये । युक्तीने यत्न होतसे ॥”

समाजाला दैववादातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी सर्वांना प्रयत्नवादाची शिकवण दिली. ते म्हणाले, ” केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ॥ यत्न तो देव जाणावा । अंतरी धरितां बळें ॥ अचूक यत्न तो देवो । चुकणें दैत्य जाणिजे ॥” ” कष्टेविण फळ नाहीं । कष्टेविण राज्य नाहीं ॥ आधी कष्टाचे दु:ख सोसिती । ते पुढे सुखाचे फळ भोगिती ॥ आधी आळसें सुखावती । त्यांसी पुढे दु:ख ॥”

प्रयत्नवादाबरोबरच रामदासांनी समाजात तेजस्वी क्षात्रधर्म जागविताना म्हटले, ” धर्मासाठी मरावें । मरोनि अवघ्यांसी मारावें । मारितां मारितां घ्यावें । राज्य आपुलें ॥”

भिती, निराशा यातून निवृत्तीकडे झुकणार्‍या – एक प्रकारें पळून जाणार्‍या – समाजाला प्रवृत्तिमार्गाचा उपदेश करताना रामदास म्हणाले, ” आधी संसार करावा नेटका । मग घ्यावें परमार्थ विवेका । येथें आळस करु नका । विवेकी हो ॥”

मठस्थापना व स्त्रियांचे सबलीकरण – आपल्या राष्ट्र्जागृतीच्या कार्यासाठी रामदासांनी देशभर जागोजागी मठ स्थापन केले. अनेक महंत – शिष्य तयार केले. एवढेच नव्हे तर स्त्रियांनाही या धर्मकार्याला लावले. रामदासांच्या अठरा स्त्री शिष्या होत्या. त्यापैकी वेणाबाईंना त्यांनी मिरजेच्या मठाची व्यवस्था सांगितली. आक्काबाईंना चाफळ व सज्जनगडाची व्यवस्था सांगितली. स्त्री जातीची निंदा करणार्‍या एका वृध्दाला रामदासांनी ” बहुता दिसांच्या वयोवृध्द मूला । जनी बायकोच्या गुणे जन्म तूला । तये जन्ननीच्या कुळा निंदितोसी । वृथा पुष्ट तू मानवामाजि होसी ॥” अशा शब्दांत फटकारले आहे. एकंदरीने रामदासांनी ही मोठीच सामाजिक क्रांती केली.

रामदासांना सर्व समाजाबद्दल प्रेम होते. त्यांची भजनाची व्याख्याच याला साक्ष आहे. ते म्हणतात, ” कोणीयेक नर । धेड महार चांभार । त्याचे राखावे अंतर । या नाव भजन ॥” सामाजिक समरसता याला म्हणावे.

याच काळात शिवाजीराजांचे हिंदवी स्वराज्य स्थापनेचे थोर प्रयत्न चालू होते. रामदासांचे कार्य राजांच्या कार्याला पूरक ठरले. शिवाजीराजांनी हिंदवीराज्य स्थापले. त्यावर अतीव आनंदाने रामदास म्हणाले, ” बुडाले सर्वही पापी । हिंदुस्थान बळावले । अभक्तांचा क्षयो झाला । आनंदवनभुवनीं ॥ बुडाला औरंग्या पापी । म्लेंछसंहार जाहला । मोडली मांडली क्षेत्रें । आनंदवनभुवनीं ॥”

चाफळजवळ शिंगणवाडी येथे रामदासस्वामी व शिवाजीराजे यांची शके १५७१ मध्ये – सन १६४९ मध्ये – भेट झाली. रामदासांनी राजांना अनुग्रह दिला. त्यानंतर त्यांच्या अनेक भेटी झाल्या. राजांचा गौरव करताना स्वामी म्हणाले, ” या भूमंडळाचे ठायीं । धर्मरक्षी ऐसा नाही । महाराष्ट्र धर्म राहिला कांही । तुम्हा कारणें ॥ —– ” सरित्पतीचें जल मोजवेना । मध्यान्हिचा भास्कर पाहवेना । मुठीत वैश्वानर बांधवेना । तैसा शिवाजीनृप जिंकवेना ॥”

शिवाजीराजांनी संभाजीराजांना सत्संगासाठी सज्जनगडावर पाठविले होते. पुढे शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांना उपदेश करताना स्वामींनी पत्रात लिहिले, “शिवरायास आठवावे। जीवित्व तृणवत मानावे । इहपरलोकी रहावे । कीर्तिरुपें ॥”

या वेळेपर्यंत रामदासस्वामींच्या अवतार कार्याची समाप्ती आली होती. जाण्यापूर्वी त्यांनी शिष्यांना म्हटले, ” माझी काया गेली खरे । परी मी आहे जगदाकारे । करु नका खटपट । पहा माझा ग्रंथ नीट ॥”

अखेरीस माघ वद्य नवमी शके १६०३ – सन १६८१ – रोजी रामदासस्वामींनी सज्जनगडावर देह ठेवला.

आता आपल्यापाशी स्वामींच्या  दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम, या मुख्य ग्रंथांशिवाय मानपंचक, धन्य ते गायनीकळा, सुकृताचा योग, बागप्रकरण, कारखाने प्रकरण, आनंदवनभुवन, शिवकल्याणराजा व इतर खूप मोठा वाङ्‍मय संभार आहे. त्याच्या अभ्यासाने आजच्या देशाच्या अवनतीच्या काळात आपल्याला नक्कीच देशोध्दाराची प्रेरणा मिळू शकते.

A saint for all ages who aimed at building powerful & virtuous human religion. Though he lived four centuries ago, his teaching transcends all limits of time. His philosophy not only reawakened & rejuvenated the then doomed spirit of Maharashtra, but is equally valid for today’s Indian scenario, engulfed by corruption, poverty, promiscuity & reckless consumerism.

The principles governing his philosophy are very simple to follow and yet unique as they appeal to the commonsense, demand action in life & aim at building character through actual behavioural changes. According to Samarth Ramdas, “time-management” is at the core of successful life.

Isn’t it the same as the modern managerial jargon? which is directed effectively towards the highest truth. Only Samartha’s philosophy can rescue our nation today from its present doom, take the nation on the part of health & wealth, by teaching youth self-courted & imbibing self-dignity.